अजय देवगणचा ‘मैदान' आणि अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हे दोन्ही चित्रपट २०२४च्या मोठ्या चित्रपटांमध्ये समाविष्ट आहे. हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही चित्रपट मोठ्या बजेटचे असून, एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. अशा परिस्थितीत १० एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर होणार आहे. दोन्ही चित्रपटांचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. आपल्या आवडत्या स्टार्सचे चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही मोठ्या प्रमाणात तिकीट खरेदी करत आहेत. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोण बाजी मारतंय जाणून घेऊया...
स्पोर्ट्स ड्रामावर आधारित अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करू शकेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये समोर आलेले आकडे पाहता, निर्मात्यांना थोडा धक्का बसू शकतो. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'मैदान'ने पहिल्या दिवशी ७६८१ तिकिटांची विक्री केली आहे. तसेच १५.९८ लाख रुपये कमावले आहेत.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' अजय देवगणच्या 'मैदान'ला टक्कर देणार आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची आकडेवारी धक्कादायक आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'बडे मियाँ छोटे मियाँ' ने आतापर्यंत ९४६३ तिकिटे विकली आहेत आणि रिलीजपूर्वीच २७.२९ लाख रुपये कमावले आहेत.
ईदच्या मुहूर्तावर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ हे दोन्ही चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित होत आहेत. दोन्ही सिनेमे बड्या स्टार्सचे असून, त्यात चुरशीची स्पर्धा असणार आहे. एकीकडे अक्षय कुमार आहे, जो गेल्या काही काळापासून सतत फ्लॉप चित्रपट देत आहे. अशा परिस्थितीत त्याला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.