जेपी दत्ता यांचा ‘बॉर्डर’ हा चित्रपट २७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. आता २७ वर्षांनंतर ‘बॉर्डर २’ची घोषणा करण्यात आली आहे. खुद्द सनी देओलने सोशल मीडियावर चाहत्यांना ही माहिती दिली आहे. १९९७च्या ‘बॉर्डर’ चित्रपटामध्ये दिसलेले कलाकार आज काय करत आहेत, ते जाणून घेऊया.
सुनील शेट्टी : ‘बॉर्डर’ या चित्रपटात सुनील शेट्टीने कॅप्टन भैरव सिंहची भूमिका साकारली होती. सध्या ‘डान्स दिवाने’मध्ये सुनील शेट्टी जजच्या भूमिकेत दिसला होता. तर, २०२३मध्ये रिलीज झालेल्या ‘हंटर टूटेगा नही, तोडेगा’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. सुनील शेट्टी या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘रुसलान’ या चित्रपटातही दिसला होता. आता सुनील ॲक्शन ॲडव्हेंचर कॉमेडी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’मध्येही दिसणार आहे.
सनी देओल : ‘बॉर्डर’मध्ये सनी देओलने मेजर कुलदीप सिंहची भूमिका साकारली होती. सनी देओल गेल्या वर्षी ‘गदर २’मध्ये दिसला होता. तर, सनी देओल २०२५मध्ये रिलीज होणाऱ्या ‘लाहोर १९४७’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रीती झिंटा, सनी देओलसोबत दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे.
जॅकी श्रॉफ : ‘बॉर्डर’मध्ये जॅकी श्रॉफने विंग कमांडर अँडी बाजवाची भूमिका साकारली होती. २०२४मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात जॅकी श्रॉफ दिसणार आहे. याशिवाय तो ‘कोटेशन गँग’ या दक्षिण भारतीय चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सनी लिओनही दिसणार आहे. IMDb नुसार, जॅकी २०२५मध्ये ‘हाऊसफुल ५’मध्ये देखील दिसणार आहे.
राखी गुलजार : अभिनेत्री राखी गुलजार यांनी ‘बॉर्डर’मध्ये सुजाता देवीची भूमिका साकारली होती. राखी गुलजार यांनी बॉलिवूडपासून बरेच दिवस स्वतःला दूर ठेवले आहे. त्या कोणत्याही चित्रपटात दिसलेल्या नाहीत. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, राखी गुलजार अनेक दशकांनंतर ‘अमर बॉस’ या बंगाली चित्रपटातून अभिनयाच्या जगात पुनरागमन करणार आहेत.
अक्षय खन्ना : ‘बॉर्डर’मध्ये अक्षय खन्नाने धरमवीरची भूमिका साकारली होती. २०२२मध्ये त्याने 'दृश्यम २' मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. आयएमडीबीनुसार, आता तो या वर्षी रिलीज होणाऱ्या ‘छावा’ या चित्रपटात दिसणार आहे.