९०च्या दशकांत बॉलिवूडमध्ये पदार्पण करून प्रेक्षकांच्या मन जिंकून घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीचे नाव आवर्जून घेतले जाते. आपल्या निरागस सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने तिने सगळ्यांच्याच हृदयावर राज्य केले होते. १२वी बोर्डाच्या परीक्षेपूर्वी ही बॉलिवूड अभिनेत्री तिच्या आईला भेटण्यासाठी मुंबईत आली होती. तिची आई अभिनेत्री होती, त्यामुळे मुंबईत आल्यावर तिची भेट चित्रपट दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांच्याशी झाली.
सईद अख्तर मिर्झाने तिला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. परंतु, या मुलीने सुरुवातीला ही ऑफर नाकारली. कारण, तिची त्यावेळी १२वी बोर्डाची परीक्षा होती. १२वी बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर अभिनेत्रीने आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झाली. पण तिच्यातील फिल्मी किडा जागृत झाला आणि तिने आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेण्याऐवजी सईद अख्तर मिर्झाच्या चित्रपटाची ऑफर घेतली. ही अभिनेत्री आहे मयुरी कांगो.
१९९५मध्ये 'नसीम' हा तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. महेश भट्ट यांना 'नसीम' मधील अभिनेत्रीचा अभिनय खूप आवडला आणि त्यांनी मयुरी कांगोला त्यांच्या पुढील चित्रपट 'पापा कहते हैं' मध्ये मुख्य भूमिका दिली. यानंतर अभिनेत्री 'बेताबी' (१९९७), 'होगी प्यार की जीत' (१९९९) आणि 'बादल' (२०००) सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.
अभिनेत्रीने 'डॉलर बहू' (२००१) आणि 'करिश्मा - द मिरॅकल्स ऑफ डेस्टिनी' (२००३) सारख्या टीव्ही सीरियल्सही केल्या. पण त्यानंतर तिने २००३मध्ये तिने अनिवासी भारतीय असलेल्या आदित्य ढिल्लनसोबत लग्न केले.