‘गोलिगत पॅटर्न’ घेऊन घरात आलेल्या सूरज चव्हाण याने सगळ्यांची मने तर जिंकलीच पण ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी पण जिंकली. यावर आता अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
सूरजने ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी जिंकताच सगळ्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. या शोचा होस्ट रितेश देशमुख याने सूरजचं विशेष कौतुक केलं. सूरजने ट्रॉफी घेताच त्याच्यासोबत पहिला सेल्फी रितेशने घेतला. हे फोटो त्याने सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत.
अभिनेता प्रवीण तरडे यांनी देखील सूरजचं तोंड भरून कौतुक केलं आहे. प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यांनी सूरजचा ट्रॉफीबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिलं की, ‘सूरज मित्रा, तू फक्त ट्रॅाफी नाही तर सगळ्यांची मनंसुद्धा जिंकलीस. साधेपणा, सच्चेपणा कायम येक नंबरच राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.’
रितेश देशमुखची पत्नी-अभिनेत्री जिनीलिया हिने देखील सूरज चव्हाणचं तोंडभरून कौतुक केलं. तिने देखील सूरजसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याचं कौतुक केलं.
केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण याला ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी जिंकल्याबद्दल शुभेच्छा तर दिल्याच. पण, त्यासोबतच त्यांनी एका चित्रपटाची घोषणा केली, ज्यात सूरज चव्हाण याला संधी देणार असल्याचे त्यांनी म्हटले.
सूरज जिंकला म्हणून त्याचं कौतुक करणारे जितके होते, तितकेच त्याच्या या विजयावर प्रश्न उपस्थित करणारे देखील अनेक लोक आहेत. सूरजच्या या विजयावर काही कलाकार मंडळी नाखुश असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्री मिताली मयेकर हिने ‘रियॅलिटी शो की सिम्पथी शो?’ अशी पोस्ट लिहिली आहे.
बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक जय दुधाणे याने देखील एक पोस्ट स्टोरीवर शेअर केली आहे. यात त्याने सूरजचे नाव घेणे टाळले आहे. त्या ऐवजी त्याने इमोजीमधून आपल्या भावना मांडल्या. तर, अभिजीत सावंतच्या खेळाचं कौतुक केलं.