स्त्रिया या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात आणि संतती प्राप्तीची प्रार्थना करतात. सनातन परंपरेत भीष्म द्वादशीच्या दिवशी केलेली पूजा सर्व इच्छा पूर्ण करणारी मानली जाते. भीष्म द्वादशी २०२४ तारीख, पूजेचा शुभ मुहूर्त आणि या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया.
यावर्षी भीष्म द्वादशी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला भीष्म पितामह यांनी प्राण त्याग केला आणि तीन दिवसांनी द्वादशीला भीष्म पितामहाचे तर्पण आणि पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे हा दिवस विशेष मानला जातो.
माघ शुक्ल द्वादशी तिथी २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी प्रारंभ होत असून, माघ शुक्ल द्वादशी तिथी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजून २७ मिनिटांनी समाप्त होईल.
भीष्म द्वादशीच्या व्रताचे महत्त्व :
भीष्म द्वादशीच्या उपवासाने सर्व प्रकारची सुख-समृद्धी प्राप्त होते. या दिवशी व्रत केल्यास सर्व पापांचा नाश होतो. या दिवशी श्री हरीची उपासना केल्याने सौभाग्य, संततीचे सुख इत्यादीचा लाभ होतो. भीष्म द्वादशीला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि पितृदोषाचे अशुभ प्रभाव दूर होतात.
भीष्म द्वादशी पूजा कशी करावी :
भीष्म द्वादशी पूजेचे शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी, स्नान आणि ध्यान केल्यानंतर, प्रथम सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे आणि त्यांचे ध्यान करावे. त्यानंतर व्रताचा संकल्प करावा.
पिवळी फुले, पिवळे वस्त्र, पिवळी फळे, पिवळे चंदन, पिवळी मिठाई, तुळशीची पाने इत्यादी श्री हरी विष्णू आणि भगवान श्री कृष्ण यांना अर्पण करा आणि श्री विष्णु सहस्त्रनामाचे पठण करा.
त्यानंतर तीळ, पाणी आणि फुले यांनी तर्पण अर्पण करावे. यादिवशी पितरांचे नामस्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
या दिवशी ब्राह्मणांना व गरीब गरजूंना आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावे. दान-धर्म केल्याने सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो.