पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ब्रिटीशकालीन भाटघर धरण पूर्ण भरले आहे. धरणातून सध्या ९ हजार ३३१ क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याचा येवा सुरू आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
धरण पट्यात सुरु असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे धरणात १०० टक्के म्हणजे २३.७४ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.
धरणाच्या ४५ स्वयंचलीत दरवाज्यांपैकी काही दरवाज्यातून सध्या पाणी सोडले जात आहे. हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या धारणाला भेट देत आहेत.
गेल्या वर्षी भाटघर धरण ऑगस्ट महिन्यात भरले होते यावर्षी भोर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने धरण लवकर भरले आहे. जर पावसाचे प्रमाण वाढले व धरणात येणाऱ्या पाणीसाठ्यात वाढ झाली तर स्वयंचलीत दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे पाटबंधारे विभागाने निरा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीच्या पात्रात कोणत्याही विभागाचे काम सुरू असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.