भारताने महिला अंडर-१९ टी-20 विश्वचषक २०२५ चे विजेतेपद पटकावले. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सनी पराभव करून इतिहास रचला. याच्या सुमारे ७ महिन्यांपूर्वी, भारताच्या पुरुष वरिष्ठ संघाने २०२४ टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते.
आता बीसीसीआयने महिला अंडर-१९ क्रिकेट संघासाठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. हा विजय भारतीय संघासाठी खास होता, कारण संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य राहिला. बीसीसीआयने भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन संघाला ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
महिला अंडर १९ वर्ल्डकप जिंकल्यानंतर आयसीसीने टीम इंडियाला फक्त ट्रॉफी दिली. याशिवाय कोणतेही रोख बक्षीस दिले नाही. पण बीसीसीआयने टीम इंडियातील लाडक्या लेकींसाठी तिजोरी खुली केली आहे.
बीसीसीआयने या संदर्भात एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "भारताच्या अंडर-१९ महिला संघाचे सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. यानिमित्त अभिनंदन. या ऐतिहासिक कामगिरीच्या सन्मानार्थ बीसीसीआयने विजयी संघ आणि सपोर्ट स्टाफला ५ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
भारतीय महिला अंडर-१९ संघासाठी ही स्पर्धा अतिशय संस्मरणीय ठरली. भारताने अ गटात राहून श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि यजमान मलेशियाचा पराभव केला. भारतीय संघाने गट फेरीतील तीनही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले.
उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा ९ विकेट्सनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यानंतर विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचाही ९ विकेट्नीच पराभव करून विजेतेपद पटकावले.