अमेरिकेतील मेरीलँड प्रांतातील बॉल्टिमोर शहरात पॅटापस्को नदीवर असलेल्या पुलाच्या खांबाला मालवाहू जहाजाने धडक दिली. या धडकेत २.६ किमी लांब पूल कोसळला. परिणामी पुलावरून जाणारी अनेक वाहने नदीच्या पाण्यात पडून सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
(Bloomberg)अपघातानंतर नदीच्या पाण्यात पडलेल्या दोघांना वाचवण्यात यश आले. हे ९०० फूट लांब मालवाहू जहाज श्रीलंकेची राजधानी कोलंबोकडे निघाले होते. जहाजातील वीजपुरवठा खंडित झाल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
(Bloomberg)बाल्टिमोरच्या पॅटापस्को नदीवर असलेल्या २.६ किलोमीटर लांब या पुलाचा दररोज ३० हजार नागरिक ये-जा करण्यासाठी वापर करतात. अपघात झाला तेव्हा पुलाच्या एका भागाच्या डागडुजीचे काम सुरू होते. डागडुजी करणारे कामगार या धडकेनंतर पुलावरून खाली नदीच्या पाण्यात पडले होते. त्यांना वाचवण्यात यश आले आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर अतिशय व्यस्त समजले जाणारे बाल्टिमोर हे बंदर अपघातानंतर काही काळासाठी बंद बंद करण्यात आले होते.
(Getty Images via AFP)‘डाली’ नावाचे हे कंटेनरवाहू जहाज सिंगापूरच्या एका जहाज कंपनीच्या मालकीचे होते. अपघातानंतर लाटांमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. नदीचे पाणी अतिशय थंड असल्याने पाण्यात पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या कार्यात अडथळे येत होते.
(Getty Images via AFP)अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरात पॅटापस्को नदीवरचे ‘फ्रान्सिस स्कॉट की’ पूल कोसळल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, या अपघातामागे कोणताही घातपात नसल्याचे बाल्टिमोरचे पोलीस आयुक्त रिचर्ड वोर्ले यांनी पत्रकारांना सांगितले.
(AFP)बाल्टिमोरचे फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज कोसळल्यानंतर मालवाहू जहाजाचे टिपलेले हवाई दृष्य. मेरीलँडचे वाहतूक विभागाचे सचिव पॉल विडेफेल्ड यांनी घटनास्थळाला भेट दिली. कोसळलेले हा पूल पुन्हा कसा उभारता येईल याची शक्यतविषयी विडेफेल्ड यांनी पडताळणी केली आहे.
(via REUTERS)या जहाजावर एकूण २२ लोक होते अशी माहिती अपघातग्रस्त जहाजाची मालकी असलेल्या ‘सिनर्जी मरीन ग्रुप’ या शिपिंग कंपनीने दिली. यातील २० जण हे भारतीय कर्मचारी होते तर दोघे जण बाल्टिमोरचे स्थानिक रहिवासी होते. स्थानिक बंदर पायलट म्हणून दोघे जण काम करत होते. जहाजावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरूप असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, जहाजावर कार्यरत भारतीय कर्मचाऱ्यांनी धोक्याची पूर्वसूचना दिली होती. या कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे शेकडो अमेरिकी नागरिकांचे प्राण वाचले असं कौतुक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे.
(via REUTERS)