विठ्ठलाच्या मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर अशा तिरंग्याच्या रुपात फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही फुलांची आकर्षक सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे.
वसंतपंचमीनिमित्त पंढरपुरात विठुराया आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा देव्हारा, गर्भगृह, चौखांबी, सोळाखांबी आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहेत.
आज प्रजासत्ताक दिनाची सुट्टी तसेच वसंत पंचमी एकाच दिवशी असल्यामुळे मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे. विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात येत आहेत.
मंदिराच्या दर्शनीभागातही फुलांची नेत्रदीपक सजावट करण्यात आली आहे. पुण्याचे विठ्ठल भक्त भुजबळ कुटुंबीयांकडून ही सजावट करण्यात आली आहे.
विठ्ठल मंदिरात आज दुपारी १२ वाजता विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यानिमित्त पंढरपुरात गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरु होती. बंगळूरू येथील एका भाविकाने विठ्ठल रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पोषाख भेट दिला आहे.तसेच एका भाविकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने विठुरायाचरणी अर्पण केले.