नवरात्री म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा सण. नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस, नऊ वेगवेगळ्या रंगात देवीला सजवलं जातं. केवळ देवीच नव्हे, तर महिला वर्ग देखील या नऊ रंगांमध्ये न्हाऊन निघतो. यातच आपल्या अभिनेत्री कशा बरं मागे राहतील…
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील ‘राणू अक्का’ म्हणजे अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने आपल्या नवरात्री विशेष फोटोशूटमधून एक वेगळा संदेश समाजाला दिला आहे. नवरात्रीचे नऊ रंग लेऊन अभिनेत्रीने एक खास फोटोशूट केले आहे. मात्र, तिने या फोटोशूटमधून एक वेगळी संकल्पना सगळ्यांसमोर सादर केली आहे.
अश्विनीने प्रत्येक रंग निवडून त्या रंगाचे पेहराव करून, त्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोशूटमध्ये ती कधीही पांढऱ्या रंगाची साडी नेसून मीराबाई बनली आहे. तर, कधी भगव्या रंगांच्या अंगरख्यावर जिरे टोप घालून एक लढवय्या स्त्री सैनिक बनली आहे.
राखाडी रंगाचा पेहराव करून चेहऱ्यावर अनेक रंग लावून तिने ‘जोकर’ हा वेष देखील धारण केला आहे. तर, हिरव्या रंगाच्या कपड्यांमध्ये तिने स्त्रीची आपबिती व्यक्त केली आहे. लाल रंगाचा पोशाख परिधान करून तिने स्त्री मधील दुर्गेच रूपच दाखवून दिलं आहे.