1सांस्कृतिक कलादर्पणचा 'सर्वोत्कृष्ट फेस ऑफ द इअर' हा पुरस्कार अलबत्या गलबत्या बालनाटयातील कन्याराजे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा हांडे हिला मिळाला आहे. रंगभूमीवर अनेक विक्रमांना गवसणी घालणारे बाल नाट्य ‘अलबत्या गलबत्या’ने तब्बल ८०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. कोरोनासारख्या आणि इतर अनेक अडचणींवर मात करत या बालनाट्याची घौडदौड सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात काही प्रमुख कलाकारांमध्ये बदल देखील झाले. पण, कन्या राजे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा हांडे हिने सलग ८०० प्रयोग केले आहेत.
विशेष बाब म्हणजे तिने कोणतीही सबब न देता किंवा रिप्लेसमेंटची मागणी न करता, हे सर्व प्रयोग केले. हा ही एक प्रकारे बालनाट्यातील एक विक्रमच म्हणावा लागेल. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक श्रद्धाच्या अतिशय जिव्हाळाचा विषय आहे, असे म्हणायला हरकत नाही. ‘कन्या राजे’ या भूमिकेचे कॉस्च्युम श्रद्धाने स्वतः डिझाईन केलेले आहेत.
‘अलबत्या गलबत्या’चे सलग प्रयोग करताना नवीन नाटक करता येत नव्हते याची खंत न बाळगता त्यांनी निर्माते राहुल भंडारे आणि सुनील पानकर यांच्या साथीने नाट्य सृष्टीमध्ये निर्माती होऊन ‘थँक्स डिअर’ नावाचे नाटक रंगभूमीवर आणले. २०१९मध्ये ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन श्रद्धा हांडे हिचा सन्मान केला होता.
या बालनाट्यातील ‘चिंची चेटकीण’ने सर्व बालक पालक रसिक प्रेक्षकांना वेड लावले आहेच. पण, त्याच बरोबरीने बालक रसिक प्रेक्षकांना हवी हवीशी वाटते ती म्हणजे कन्या राजे... कित्येकदा लहान मुले बॅक स्टेजला येऊन हट्ट करतात. या कन्या राजेला आपण घरी घेऊन जायचे का? असं विचारतात. तर, कधी मुलांच्या आईना देखील असे वाटते की, अरे ही तर मीच, मी पण लग्ना आधी अशीच होते. माझ्या वडिलांची कन्याराजे आणि म्हणूनच प्रत्येक प्रयोगानंतर कन्या राजें सोबत सेल्फी घेण्यासाठी आणि रीलसाठी बालक पालक रसिक प्रेक्षक गर्दी करतात.
एवढंच नव्हे तर, तिकीट बुकिंग नंबरवर फोन करुन कन्याराजे यांचा पेहराव आम्हाला कुठे मिळेल याबाबत विचारणा करतात. तिच्यासारखे लांब केस आणि कन्या राजेचा लेहंगा हवा असा हट्ट लहान मुली करतात आणि इतकेच नाही तर पुन्हा प्रयोगाला येतांना तसे कपडे घालूनसुद्धा येतात. या सर्व गोष्टींची दखल घेऊन सांस्कृतिक कलादर्पणने यंदाचा 'सर्वोत्कृष्ट फेस ऑफ द इअर' पुरस्काराने अभिनेत्री श्रद्धा हांडे यांचा सन्मान केला. याबद्दल ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचे निर्माते राहुल भंडारे तसेच संपूर्ण टीम त्यांचे अभिनंदन केले.