आजघडीला अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने बॉलिवूड तसेच फॅशनच्या दुनियेतही स्वतःचं नाव कमावलं आहे. पण एक वेळ अशी होती, जेव्हा तिला एकसारख्या भूमिकांमुळे आणि त्यासाठी तयार केलेल्या विशिष्ट शरीरयष्टीमुळे खूप संघर्ष करावा लागला होता. नुकताच तिने याविषयी खुलासा केला आहे. आपला गमवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी भूमी पेडणेकर फॅशनकडे वळली.
याबद्दल खुलासा करताना, भूमी म्हणाली की, ‘मी मोठी होत असताना, मला आत्मविश्वास वाटावा यासाठी संघर्ष करावा लागला, विशेषत: विशिष्ट सौंदर्य आदर्शांमध्ये बसण्याच्या दबावामुळे मी खूप संघर्ष केला. स्वत:चा शोध घेण्यासाठी मी फॅशनकडे वळले. मी जसजशी मोठी झाले, तसतशी माझ्यात सौंदर्य आणि फॅशनची समज विकसित झाली.’
अलीकडच्या काळात भूमी पेडणेकर तिच्या फॅशन स्टेटमेंटने सगळ्यांनाच हैराण करत आहे. ते तिच्या लुक्सवर वेगवेगळे प्रयोग करत आहे. ‘हे फक्त मी चांगलं दिसण्यासाठी किंवा ट्रेंडचे अनुसरण करण्यासाठी करत नाही. तर, मी माझे व्यक्तिमत्व स्वीकारत आहे. आज फॅशन आणि सौंदर्य हे एक माध्यम आहे, ज्याद्वारे मी स्वतःला आणि माझ्या मनाची स्थितीला भावनिक कॅनव्हासवर व्यक्त करू शकते’, असे भूमी म्हणाली.
भूमी पेडणेकर म्हणाली की, ‘मला वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. मला फक्त फॅशनमध्ये खूप धमाल करायची आहे आणि मला वाटते की मी हे माझ्या मनापासून करत आहे आणि म्हणूनच लोक माझ्या फॅशनचे कौतुक करत आहेत. आधी लोकांनी मला एका चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फॅशनने मला या सगळ्यातून बाहेर काढले आहे.’
आपल्या चित्रपट प्रवासाबद्दल बोलताना भूमी म्हणाली की, ‘मी आतापर्यंत केलेल्या जास्तीत जास्त चित्रपटांमध्ये एखाद्या लहान शहरातील एका मुलीची भूमिका केली आहे आणि त्यामुळे मी साध्याभोळ्या मुलीच्या रूपातच चांगली दिसू शकते असा समज लोकांच्या मनात निर्माण झाला होता. लोकांना मला असं बघायला आवडतं, हे मान्य आहे. पण मलाच ही चौकट मोडून काढायची होती. फॅशनच्या माध्यमातून मी स्वत:ला व्यक्त करत आहे.’