हरिओम विठ्ठला, ज्ञानोबा-माऊली तुकाराम, पाऊले चालती पंढरीची वाट, माऊली, माऊली अशा अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नागमोडी वळणाचा चार किलोमीटरचा अवघड दिवे घाट लीलया पार केला.
विठ्ठलाच्या नामाचा अखंड जयघोष करीत व भक्तीचे भारावलेपण घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने लाखो वैष्णवांचा साथीने मंगळवारी दिवे घाटातील सर्वात अवघड नागमोडी वळण पार करत हा सोहळा सासवड येथे मुक्कामी पोहोचला.
डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात टाळ, मृदुंग, मुखाने ज्ञानोबा तुकाराम च्या नावाचा जयघोष करीत घाट पार करीत होते.
पालखी सोहळा दिवे घाट पार करत असतांना वरुणराजाने देखील हजेरी लावत माऊलीच्या पालखीचे जणू दर्शन घेतले. सायंकाळी साडेचार वाजता संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे वैष्णवासमवेत दिवेघाटातून पुरंदर तालुक्यात आगमन झाले.
यावेळी घाटात पालखीच्या दर्शनासाठी उपस्थित असलेलेल्या हजारो भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाट आणि पुष्पवृष्टी करीत या पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत केले.
संत ज्ञानेश्वर महाजराजांचा पालखी सोहळा पुण्यातील मुक्काम आटोपून मार्गस्थ झाला. हा सोहळा दुपारी २ वाजता वडकीनाला येथे विसाव्यासाठी थांबला. वडकी ग्रामस्थांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले. येथील विसावा आटोपून हा सोहळा ३.३० वाजता दिवेघाटातील वाटेने मार्गस्थ झाला.
माऊलीच्या रथाला पाच बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या. यावेळी ढग भरून आले होते. तसेच गार वारा असल्याने हा घाट चढण्यासाठी वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.