‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टीव्ही शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शोपैकी एक आहे. हा शो गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि त्यातील प्रत्येक स्टार कास्ट प्रत्येक घराघरात प्रसिद्ध आहे. २००८मध्ये सुरू झालेला हा शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.
गेल्या १४ वर्षांच्या प्रवासात अनेक जुन्या कलाकारांनी हा शो सोडला आहे. या शोविषयी अनेक वाद देखील निर्माण झाले होते. या मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवाल हिने आता दिलीप जोशी म्हणजेच या मालिकेतील ‘जेठालाल’बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ‘जेठालाल’ यांनी देखील एकदा शो सोडण्याची धमकी दिली होती.
‘बॉलिवूड ठिकाना’शी बोलताना जेनिफरने सांगितले की, एकदा दिलीप जोशी यांचे सोहेल रहमानीसोबत भांडण झाले होते. सोहिल दुसरा कोणी नसून शोचा ऑपरेशनल हेड होता. जेनिफरने सांगितले की, एकदा दिलीप आणि सोहिल यांच्यात काही मुद्द्यावरून जोरदार भांडण झाले आणि सोहिलने अभिनेत्यावर खुर्ची फेकून मारली. त्यावेळी दिलीप जोशी यांनी धमकी दिली होती की, सोहिल या शोमध्ये राहिला, तर ते हा शो सोडतील.
अभिनेत्रीने पुढे सांगितले की, हे भांडण संपवण्यासाठी सोहिलला दिलीप जोशी यांच्यापासून दूर ठेवण्यात आले आणि या घटनेला फक्त २ वर्ष झाली आहेत. इतकेच नाही तर बाकीच्या कलाकारांनीही सोहिलच्या गैरवर्तनामुळे त्याच्यावर बहिष्कार टाकला होता.
नुकतेच हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सोहिलने जेनिफरच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित केला होता आणि विचारले होते की, इतक्या समस्या होत्या तर, ती या शोमध्ये परत का आली होती? तो म्हणाला की, जेनिफर स्वतः परत आली होती आणि तिच्यावर कोणीही जबरदस्ती केली नव्हती. तिने असित भाईंना मेसेज का केला की, मी सुधारलो आहे सर, मला संधी द्या. तिचे प्रॉब्लेम केवळ तिलाच माहित आहेत.