पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरेरे! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

उन्हाचा तडाखा जाणवू लागल्यानंतर ज्याच्याकडे सगळ्यांचे लक्ष असते, ते म्हणजे मान्सूनचे आगमन कधी होणार आणि तो कसा बरसणार. पण यंदा या आघाडीवर काहीशी निराशाजनक बातमी आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे 'स्कायमेट'ने म्हटले आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे जून ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा पाऊस कमी पडण्याची शक्यता ५५ टक्के इतकी आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार मान्सूनचे दीर्घकालीन सरासरी प्रमाण यंदा ९३ टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन मान्सूनचे प्रमाण ९० ते ९५ टक्क्यांच्या दरम्यान असेल, तर पाऊस कमी होणार असे समजले जाते. यंदा हे प्रमाण ९३ टक्के राहिल, असा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस कमी पडणार हे निश्चित आहे. १९५१ ते २००० या कालावधीमध्ये पडलेल्या पावसाच्या आधारावर मान्सूनचे दीर्घकालीन सरासरी प्रमाण काढले जाते. 

पाऊस कमी पडल्यास त्याचा एकूणच शेती अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होतो. गेल्या वर्षीही महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला. त्यामुळे राज्यातील २६ जिल्ह्यातील २० हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. त्यातच यंदाही पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांवरील चिंतेचे सावट आणखी गडद झाले आहे. 

साधारणपणे मान्सूनचे एक जूनला केरळमध्ये आगमन होते आणि पुढे चार महिने त्याच्या संपूर्ण देशात वास्तव्य असते. यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाकडूनही लवकरच मान्सूनचा अंदाज वर्तविला जाईल. तो पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.