पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राफेल प्रकरणी केलेल्या वक्तव्याचा खुलासा करा, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना आदेश

राहुल गांधी

राफेल प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. या संदर्भात न्यायालयाने अधिकृतपणे राहुल गांधी यांना कोणतीही नोटीस पाठवलेली नाही. पण पुढील सोमवारपर्यंत बाजू मांडण्याचे तोंडी आदेश न्यायालयाने राहुल गांधी यांना दिले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे आदेश दिले.

राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने याआधी दिलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून राहुल गांधी लोकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्या मनातील वाक्ये ते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणून लोकांसमोर सांगत आहेत. राहुल गांधी अशा पद्धतीने दिशाभूल करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करीत असल्याचे मीनाक्षी लेखी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते. त्यावर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. 

गेल्या आठवड्यात अमेठीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सर्वोच्च न्यायालयानेही चौकीदार चोर है, असे म्हटल्याचे सांगितले. जे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे, असे वरिष्ठ अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सोमवारी न्यायालयात सांगितले. याच मुद्द्यावरून त्यांना खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. 

राहुल गांधी यांनी या प्रकरणात माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर केलेले वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाच्या राफेल प्रकरणातील आदेशांना धरून नव्हते. राहुल गांधी यांनी चुकीच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अर्थ लावला आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी, २३ एप्रिल रोजी होणार आहे. राहुल गांधी हे अमेठीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.