उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबादमधील ओलीस नाट्यास धक्कादायक वळण मिळाले आहे. २० मुलांना ओलीस ठेवलेल्या गुन्हेगाराचा खात्मा केल्यानंतर जमावानं त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. या मारहाणीत आरोपी सुभाष बाथमची पत्नी गंभीर जखमी झाली होती. तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. यातच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.
मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली होती, तिच्या शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण कळेल अशी माहिती कानपूर पोलिसांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली.
आठ तास चाललं ओलीसनाट्य
सुभाष बाथम यानं गुरुवारी वाढदिवसाच्या पार्टीचा बहाणा करुन गावातील मुलांना संध्याकाळी घरी बोलावले होते. घरात मुलं जमल्यानंतर त्यानं सर्वांना घरात बंदीस्त करुन ठेवले. काही स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीनं बाथमच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानं गोळीबार केला. यात तीन पोलिस आणि गावकरी जखमी झाले. तसेच कमी तीव्रतेचा बॉम्बही त्यानं पोलिसांच्या दिशेनं फेकला. आपल्याजवळ ३० किलो स्फोटकं असल्याचं सांगून त्यानं धमकावण्याचाही प्रयत्न केला. मुलांच्या सुटकेची कारवाई तब्बल ८ तास चालली. पोलिसांनी सातत्यानं आरोपीशी चर्चा करुन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला अखेर प्रसंगाचं गांभीर्य पाहता एनएसजी कमांडोंनी परिस्थितीचा ताबा घेतला. काही वेळातच एनएसजीचं पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई करत त्यांनी आरोपीचा खात्मा केला.
निळवंडे धरणासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती