पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचं निधन

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन

देशातील दिग्गज वकिलांमध्ये समावेश असलेले ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे रविवारी सकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. जेठमलानी हे मागील दोन आठवड्यांपासून आजारी होते. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी कायदा मंत्री आणि शहरी विकास मंत्री म्हणून काम पाहिले होते. वर्ष २०१० मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्षपदही सांभाळले होते. सध्या ते आरजेडीचे राज्यसभा सदस्य होते. एक वकील या नात्याने त्यांनी देशातील अनेक बहुचर्चित खटले लढले आहेत. यातील अनेक खटले हे वादग्रस्तही होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेठमलानी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

राम जेठमलानी यांचा जन्म १४ सप्टेंबर १९२३ ला सिंध प्रांतातील शिकारपूर येथे झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव हे राम बोलचंद जेठमलानी असे होते. राम जेठमलानी हे अभ्यासात प्रचंड हुशार होते. त्यांनी इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी एकाच वर्षी उत्तीर्ण झाले होते. वयाच्या १३ व्या वर्षी ते त्यावेळची मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांचे वडील बोलचंद गुरमुखदास जेठमलानी आणि त्यांचे आजोबाही वकील होते.
सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अनेक मोठे खटले लढले होते. त्यांचा पहिला चर्चित खटला हा १९५९ मध्ये के एम नानावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य हा होता.  

त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे मारेकऱ्यांचा खटला मद्रास उच्च न्यायालयात २०११ मध्ये लढला होता. शेअर बाजार घोटाळ्याती हर्षद मेहता आणि केतन पारेख यांचा खटला लढला होता. त्यांचा सर्वांत वादग्रस्त खटला हा अफजल गुरुचा होता. अफजल गुरुला फाशी देऊ नये यासाठी त्यांनी खटला लढला होता. जेसिकाला हत्याकांडमध्ये त्यांनी मनु शर्माच्या बाजूने खटला लढला होता.