पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बगदादीच्या उत्तराधिकाऱ्याचाही खात्मा, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प

आयसीसचा म्होरक्या अबू बाकर अल बगदादीला यमसदनी धाडल्यानंतर आता त्याच्या पहिल्या क्रमांकाच्या उत्तराधिकाऱ्याचाही खात्मा करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करत याची घोषणा केली. बगदादीच्या मृत्यूनंतर या दहशतवादी संघटनेची जबाबदारी अब्दुल्लाह कार्दशकडे येईल असे बोलले जात होते. परंतु, ट्रम्प यांनी मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव सांगितलेले नाही. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार बगदादी अनेक आजारांनी ग्रस्त होता. त्यामुळे कार्दश हाच दहशतवादी संघटनेचे काम पाहत होता. 

बगदादीच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांनी त्याच्या उत्तराधिकाऱ्याबाबत माहीत असल्याचे म्हटले होते. कुख्यात दहशतवादी बगदादी अमेरिकन सैन्याच्या हवाई हल्ल्यात मारला गेल्याची घोषणा ट्रम्प यांनी शनिवारी केली होती. आम्हाला त्याच्या उत्तराधिकाऱ्याबाबतही माहिती आहे. त्याच्यावर आमची नजर आहे, असेही ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वटमध्ये म्हटले की, आत्ताच दुजोरा मिळाला आहे की, बगदादीचा क्रमांक एकचा उत्तराधिकारी अमेरिकन सैन्याकडून मारला गेला आहे. तो आयसीसचा म्होरक्या होणार होता. आता त्याचा खात्मा झाला आहे.

कोण होता बगदादीचा उत्तराधिकारी
माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार बगदादीचा उत्तराधिकारी हा अब्दुल्लाह कार्दश होता. न्यूज वीकच्या वृत्तानुसार, कार्दस इराकचा माजी हुकूमशहा सद्दाम हुसेनच्या लष्करात काम करत होता, असे सांगितले जात आहे. मृत्यूपूर्वी बगदादी कोणत्याच ऑपरेशनमध्ये सहभागी होत नव्हता. तो आदेश द्यायचा आणि त्याची अंमलबजावणी कार्दश करत असत. ऑगस्टमध्ये एका हवाई हल्ल्यात जखमी झाल्यापासून बगदादीने संघटनेची कमान कार्दशकडे सोपवली होती.