दिल्लीतील धान्य बाजार परिसरातील इमारतीला रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीमध्ये ४३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अत्यंत ह्रदयद्रावक अशा या घटनेत मृत पावलेल्यांनी आपल्या कुटुंबियांना, मित्रांना घटनास्थळावरून केलेले फोन आणि त्यावेळी दिलेली माहिती वाचल्यावर मन सुन्न होते. शाकीर नावाच्या एका व्यक्तीने आपल्या गरोदर पत्नीला फोन केला आणि तिला सांगितले की आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसराला वेढले आहे. मी त्यात पूर्णपणे अडकलो आहे. यातून जिवंत बाहेर येणे अशक्य आहे. शाकीरच्या घरात तीन मुले आहेत. त्यामध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरण: सात पोलिसांचे निलंबन
शाकीरप्रमाणेच या आगीत अडकलेल्या मोहम्मद मुशर्रफ याने आपला मित्र मोनू आगरवाल याला फोन केला. रविवारी पहाटे त्याने मोनूला फोन लावला. एवढ्या पहाटे मोहम्मदचा फोन बघून आधी मोनूला आश्चर्य वाटले. पण फोन घेतल्यावर मोहम्मदने आपल्यावर नक्की काय परिस्थिती ओढावली आहे, याची माहिती मोनूला दिली. इथून बाहेर जाण्याचा कोणताच मार्ग नाही. माझ्या कुटुंबियांकडे लक्ष दे...असे मोहम्मदने मोनूला सांगितले. मोनूने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे त्याच्या लक्षात आले. पलीकडून लोकांच्या घाबरून बचतीसाठी ओरडण्याचे आवाज फोनवर मोनूला येत होते. मला आता श्वासही घेणे अवघड झाले असल्याचे मुशर्रफने मोनूला सांगितले.
दिल्ली अग्नितांडव: त्याच इमारतीला पुन्हा लागली आग
उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये शहजादने केलेल्या फोनमुळे त्याचे कुटुंबीय जागे झाले. शहजादही या आगीत सापडला होता. संपूर्ण इमारतीला आग लागलीये. बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही. माझी वाचण्याची शक्यता खूप कमी आहे, असे शहजादने फोनवरून आपल्या वडिलांना सांगितले. त्याच्या वडिलांनी लगेचच आम्हाला सगळ्यांना उठविले, अशी माहिती शहजादच्या काकांनी दिली. शहजाद वडिलांशी बोलत असतानाच कॉल कट झाला. वडिलांनी परत फोन लावण्याचा प्रयत्न केला पण शहजादचा फोन काही लागला नाही, असेही त्याच्या काकांनी सांगितले.