पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तीस लाख परत न केल्यानं टिकटॉक फेम मोहित मोरची हत्या- पोलिस

मोहित मोर

 तीस लाखांची रक्कम परत करण्यास दिलेला नकार आणि बदल्यात  गँगस्टरकडून मागितलेलं संरक्षण यामुळे टिकटॉक फेम मोहित मोरची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील २७ वर्षीय मोहितची भर रस्त्यात गोळ्या घालून या आठवड्यात हत्या करण्यात आली होती. मोहितच्या हत्येप्रकरणी ३ संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये एक  अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे.

 रविवारी द्वारका मोड येथे गँगवॉर झाला  यामध्ये गँगस्टर विकास दलाल आणि  प्रविण गहलोट यांचा खून करण्यात आला. या गँगवॉरनंतर दोन दिवसांत मोहितची गोळ्या झाडून हत्या   करण्यात आली. मोहितला विकास दलालच्या मंजित महल गँगकडून संरक्षण पुरवलं जातं होतं, त्यामुळे दलालच्या हत्येनंतर मोहितचाही काटा काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

या प्रकरणात एका १७ वर्षीय अल्पवयीन गुन्हेगाराला अटक करण्यात आली. हा अल्पवयीन गुन्हेगार महिन्याभरापूर्वी संदीप पेहलवानच्या गँगमध्ये सहभागी झाला होता. या मुलाला मोहितला मारण्याची सुपारी देण्यात आली.

काय आहे नेमकं प्रकरण?
 मोहितची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याच्या  नावे कोणत्याही गुन्ह्याची नोंद नव्हती.  मात्र अनेक गँगस्टरच्या तो अवतीभोवती असायचा, अशी माहिती पोलिस अधिकारी संजीव कुमार यादव यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिली. 

२०१७ मध्ये मोहितनं मंगू नावाच्या  गँगस्टरला दिल्लीमधील  एका प्रॉपर्टीमध्ये ३० लाखांची रक्कम  गुंतवण्यास मदत केली होती. मात्र एका गँगवॉरमध्ये  मंगू गँगस्टरचा मृत्यू झाला. मंगूच्या हत्येनंतर त्याच्या मित्रानं  ३० लाख रुपये मोहितकडे परत मागितले यातला एक होता संदीप पेहलवान. मात्र मोहितनं ३० लाख रुपये परत करण्यास नकार दिला. 

याचदरम्यान मोहितनं  गँगस्टरसोबत शत्रूत्व ओढून घेतलं. संदीप पेहलवानकडून पैसे परत करण्यासाठी वारंवार धमक्या येत असल्यानं मोहितनं मंजित महल गँगकडून संरक्षण  मागितलं. 

रविवारी द्वारका मोड येथील गँगवॉरमध्ये मंजित महल गँगमधल्या दोघांची हत्या झाली. या हत्येनंतर संदीप पेहलवाननं पुन्हा एकदा मोहितकडे पैसे मागितले  मात्र त्यानं नकार दिल्यानंतर संदीप पेहलवाननं तिघांना मोहितच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती संजीव कुमार यादव यांनी  हिंदुस्थान टाइम्सला दिली.