पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला: शस्त्र साठ्यासह तिघांना अटक

जम्मू-काश्मीर कारवाई

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक करत जवानांनी मोठी कारवाई केली आहे. या दहशतवाद्यांकडून ६ रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पंजाब-जम्मू-काश्मीर सीमेवरील लखनपूर येथे ही कारवाई करण्यात आली आहे. एका ट्रकमधून शस्त्रसाठा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी ट्रक अडवून ही कारवाई केली आहे.

कठुआ येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एके-४७ सह मोठा शस्त्रसाठा घेऊन जाणाऱ्या ट्रकला जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांकडून ४ एके-५६, २ एके-४७, ६ मॅगझिन, १८० जिवंत काडतूस आणि ११ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. जवानांनी दोन दिवसांत ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. याआधी बुधवारी जवानांनी लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी आसिफला ठार केले होते. सोपोरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी शोधमोहीम सुरु केली. त्यावेळी दहशतवादी आसिफला ठार करण्यात आले.

आसिफने सोपोर येथे एका फळ विक्रेत्याच्या घरामध्ये घुसून गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये एका लहान मुलीसह तीन जण गंभीर जखमी झाले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरिफ सफरचंद विक्रेत्यांना धमकी देत होता. त्याने जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली होती. गेल्या एका महिन्यापासून तो सक्रिय होता.