पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या प्रकरणी दाखल सर्व फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या

सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद विवादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या निकालाविरोधात दाखल झालेल्या सर्व फेरविचार याचिका गुरुवारी फेटाळण्यात आल्या. फेरविचार याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर याचिका फेटाळण्यात आल्या.

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी एकमताने निर्णय दिला होता. त्यामध्ये वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्ला विराजमान पक्षकारांना अर्थात हिंदू पक्षकारांना देण्याचा निर्णय देण्यात आला होता. त्याचवेळी एकूण जागेपैकी पाच एकर जागा मुस्लिम समाजाला देण्याचे निर्देशही त्यावेळी न्यायालयाने दिले होते. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी एकूण १८ फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्या सर्वांवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या दालनात गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी ९ नोव्हेंबर रोजी दिलेला निकाल अंतिम असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आणि सर्व फेरविचार याचिका फेटाळून लावल्या.

सर्व फेरविचार याचिका एकाच सुनावणीत फेटाळल्यानंतर आता याचिकाकर्त्यांपुढे निर्णय सुधार याचिका (क्युरिटिव्ह पिटिशन) हाच एक पर्याय उपलब्ध आहे. १८ फेरविचार याचिकांमध्ये जमैत उलमा आय हिंद आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या याचिकांचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निकालाने हिंदूंनी १९९२ मध्ये जे कृत्य केले होते त्याला एक प्रकारे मान्यताच मिळाली असल्याचे याचिकाकर्त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले.