पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमध्ये सरकार भीतीचे वातावरण निर्माण करत आहेः काँग्रेस

काश्मीरमध्ये सरकार भीतीचे वातावरण निर्माण करत आहेः काँग्रेस (Biplov Bhuyan, HT Photo)

काँग्रेसने जम्मू-काश्मीर खोऱ्यातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करत अमरनाथ यात्रेला स्थगिती देण्याचा आणि पर्यटकांनी परतण्याची सूचना देण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. हे दोन्ही मुद्दे संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने भारत सरकारवर ३० वर्षांनंतर काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण पसरवण्याचा आरोप केला असून सरकारच्या या कृतीमुळे १९९० च्या दशकाच्या आठवणी ताज्या झाल्याचे म्हटले आहे.

काश्मीरमध्ये अतिरिक्त जवानांच्या तैनातीवर राज्यपाल म्हणतात..

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मोदी सरकारने 'भलते धाडस' न करण्याचा इशारा दिला. या पत्रकार परिषदेला गुलामनबी आझाद, माजी गृहमंत्री पी चिदंबरम, जम्मू-काश्मीरच्या काँग्रेसच्या प्रभारी अंबिका सोनी, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा आणि डॉ. कर्ण सिंह हे उपस्थित होते. 

गुलामनबी आझाद म्हणाले की, आजपर्यंत कोणत्याच सरकारने अशा पद्धतीची सूचना दिली नव्हती. वर्ष २००० मध्ये दहशतवादी हल्ल्यात ८९ यात्रेकरु आणि सामान्य नागरिक मारले गेले होते. तरीही अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली नव्हती. अतिरिक्त जवानांची तैनाती आणि सूचना जारी केल्यामुळे भारत सरकार भीतीचे वातावरण तयार करत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये नक्की काय सुरु आहे? अब्दुल्ला यांचा संतप्त सवाल

ते म्हणाले की, काही घटना मागील एक-दोन आठवड्यात घडल्या आहेत. १०-१५ दिवसांपूर्वी इथून सुमारे २५ हजार, काही जण ३५ हजार अतिरिक्त जवानांना तैनात केल्याचे सांगत आहेत. पुलवामा हल्ला वगळता यावर्षी दहशतवादी हल्ल्यांची सर्वांत कमी संख्या आहे. यावर्षी सर्वाधिक यात्रेकरु अमरनाथ यात्रेला जात आहेत. पर्यटक आले आहेत. अशावेळी अतिरिक्त जवानांची तैनात चिंतेची बाब आहे.