पाकिस्तानमध्ये हिंदूंवर कसे अत्याचार केले जातात हे जाणून घेण्यासाठी अखिलेश यादव यांनी महिनाभर पाकिस्तानमध्ये जाऊन राहावे, अशी टीका भाजपचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी केली. देशात सध्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनसीआर) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी सुची अद्ययावत करणे (एनपीआर) आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) यावरून गदारोळ सुरू आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने या सगळ्याला तीव्र विरोध केला आहे. हे सर्व देशातील अल्पसंख्य समाजाच्या विरोधात असल्याचे त्यांच्या पक्षाचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वतंत्रदेव सिंह यांनी ही टीका केली.
फडणवीस आणि महाजनांमुळे माझं तिकीट कापलं: एकनाथ खडसे
स्वतंत्रदेव सिंह म्हणाले, या कायद्यांवरून सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. हे कायदे कोणत्याही एका समाजाविरोधात तसेच गरिबांविरोधात नाही. अखिलेश यादव यांनी एक महिना पाकिस्तानात जाऊन राहावे आणि तेथील हिंदू मंदिरांमध्ये प्रार्थना करून दाखवावी. त्यावेळीच त्यांना तिथे हिंदूंवर कसे अत्याचार केले जाताहेत याची माहिती होईल.
एनसीआर आणि एनपीआर हे सर्व देशातील अल्पसंख्य समाजाच्या विरोधात असल्याचे अखिलेश यादव यांनी २९ डिसेंबर रोजी म्हटले होते. आपण एनपीआरचा अर्ज भरणार नाही आणि त्यावर स्वाक्षरीही करणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
'ठाकरे सरकार मुंबई नव्हे दिल्लीतील 'मातोश्री'च्या आदेशावर चालेल'
स्वतंत्रदेव सिंह म्हणाले, एनपीआरमध्ये काहीही वादग्रस्त नाही. केवळ रहिवाशांना आपले आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स दाखवायचे आहे. त्याचबरोबर ज्या भागात आपण राहतो, त्या भागातील तीन नागरिकांनी आपण तेथील रहिवासी आहोत, एवढे सांगितले पाहिजे. अखिलेश यादव आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांऐवजी आपल्या नातेवाईकांनाच मोठे स्थान देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.