पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासासाठी नव्या अध्यक्षांचा महत्त्वाचा सल्ला

ओम बिर्ला

लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळी खासदारांकडून विचारण्यात येणारे प्रश्न छोटे आणि नेमके असावेत. त्याचवेळी प्रश्नांना संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून दिले जाणारे उत्तरही मुद्देसूद आणि नेमके असले पाहिजे, असा सल्ला लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना दिला.

लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीला काही मंत्री आणि प्रमुख राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी ओम बिर्ला यांनी लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जावेत, अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासाचा अधिक परिणामकारक वापर करता यावा, यासाठी त्यांनी प्रश्न आणि उत्तर या दोन्हीमध्ये नेमकेपणा असावा, असा सल्ला दिला.

चंद्राबाबू नायडूंना धक्का, टीडीपीचे ४ राज्यसभा खासदार भाजपत

प्रश्न छोटे आणि नेमके असतील आणि त्याला मंत्र्यांकडून नेमकेपणाने उत्तर दिले गेले, तर प्रश्नोत्तराच्या तासांत जास्त प्रश्न विचारता येतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जास्तीत जास्त प्रश्न या तासामध्ये सामावून घेता येतील, यासाठी त्यांनी हे बदल करण्याचे सूचित केले आहे.

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर सकाळी ११ ते १२ या एक तासाच्या वेळेला प्रश्नोत्तराचा तास असे म्हटले जाते. यामध्ये सभागृहातील सदस्य दोन प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. ज्यात लेखी आणि तोंडी उत्तर याचा समावेश असतो. तोंडी उत्तरे सभागृहातच संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून दिली जातात. जर तोंडी उत्तराने प्रश्न विचारणाऱ्या सदस्याचे समाधान झाले नाही, तर तो उपप्रश्न विचारू शकतो. 

चंद्राबाबू नायडूंना धक्का, टीडीपीचे ४ राज्यसभा खासदार भाजपत

संसदेकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळी विरोधकांकडून सर्वाधिक गोंधळ घातला जातो. त्याचबरोबर खासदारांकडून विचारण्यात येणारे प्रश्न नेमके नसतात. त्याला मंत्र्यांकडूनही दीर्घ उत्तरे दिली जातात.

ओम बिर्ला यांच्या सल्ल्याला राजकीय पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बिजू जनता दलाचे गटनेते पिनाकी मिश्रा म्हणाले, लोकसभा अध्यक्षांनी दिलेला सल्ला योग्यच आहे. अनेकवेळा प्रश्न नेमके नसल्यामुळे आणि मंत्र्यांकडून त्याला भलीमोठी उत्तरे दिली गेल्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात लोकसभेत ५-६ प्रश्नच विचारले जातात. प्रश्न छोटे असावेत आणि त्याला नेमकी उत्तरे दिली जावीत, असे अध्यक्षांचे म्हणणे योग्यच आहे.