पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव, कपिल सिब्बल मांडणार बाजू

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे

सत्तास्थापनेसाठी वाढीव वेळ देण्यात यावा, ही शिवसेनेची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाकारल्यानंतर आणि राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्यानंतर आता शिवसेनेने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी २४ तासांचा वेळ दिला होता. तो सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता संपला. आपल्याला आणखी दोन दिवसांचा वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण ती नाकारण्यात आली. यानंतर राज्यपालांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन कऱण्यासाठी निमंत्रण दिले. त्यांनाही आता २४ तासांचा वेळ देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही मंगळवारी दुपारी आणखी दोन दिवसांचा वेळ वाढवून मागितला. पण वेळ वाढवून द्यायला नकार देत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. 

आमच्यात एकवाक्यता झाल्याशिवाय शिवसेनेला पाठिंबा नाहीः अजित पवार

शिवसेनेने सोमवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर शिवसेना सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेला रविवारी संध्याकाळी सत्ता स्थापन कऱण्याचे निमंत्रण देण्यात आले. त्यांना सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याची पत्रे दिली नाहीत. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी राजभवनावर गेलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे आणखी दोन दिवसांचा वेळ मागितला. आम्हाला सरकार स्थापन करायचे आहे. पण आमच्याकडे पाठिंब्याची पत्रे नाहीत. त्यामुळे आम्हाला आणखी वेळ दिला जावा, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. पण राज्यपालांनी वेळ वाढवून दिला नाही. 

'विनाकारण आम्हाला बदनाम करू नका'

राज्यपालांनी राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला होता. पण शिवसेनेला केवळ एकच दिवसाचा वेळ देण्यात आला. त्यांनी वेळ देण्यावरून दुजाभाव केला आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडणार असल्याची माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. शिवसेना नेते अनिल परब यांनीही याला दुजोरा दिला आहे.