पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वायू' गुरुवारी सकाळी गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता, अतिदक्षतेचा इशारा

वायू चक्रीवादळ (संग्रहित छायाचित्र)

अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळ गुरुवारी पहाटे गुजरातच्या किनारपट्टीला वेरावळजवळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १४० ते १५० किलोमीटर इतका असेल. यामुळे गुजरातमध्ये किनारपट्टीच्या भागात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कच्छपासून दक्षिण गुजरातपर्यंतच्या सर्व किनारपट्टीमध्ये दक्षता बाळगण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

दीड महिन्यापूर्वी ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलेल्या फेनी चक्रीवादळावेळी त्यांनी कोणती उपाययोजना केली होती, हे समजून घेण्यासाठी गुजरातमधील अधिकारी ओडिशा सरकारच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून आपत्ती निवारणाची माहिती घेण्यात येत आहे. १३ आणि १४ जून हे दोन्ही दिवस गुजरातच्या किनारपट्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल आणि अन्य संस्थांकडून आवश्यक मदत घेतली जाईल, असे विजय रुपाणी यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी नवी दिल्लीत वायू चक्रीवादळाची दिशा आणि त्यामुळे होणारे संभाव्य नुकसान यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाय योजण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुजरातमध्ये एनडीआरएफची २६ पथके आधीच तैनात ठेवण्यात आली आहेत. आणखी १० पथके पाठविण्यात येणार आहेत. तटरक्षक दल, नौदल, लष्कर आणि हवाई दल यांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गरज पडल्यास त्यांनाही बचावकार्यासाठी बोलावण्यात येईल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:severe cyclonic storm vayu likely to hit gujarat thursday 13 june morning high alert declare