पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमानाच्या शोधासाठी नौदल, इस्रोची मदत

प्रातिनिधिक छायाचित्र

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील 'एएन ३२' या सोमवारी बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेण्याचे काम आणखी वेगवान करण्यात आले आहे. या कामामध्ये आता नौदलाची एक तुकडी आणि इस्रोच्या उपग्रहाचीही मदत घेण्यात येत आहे. गेल्या २४ तासांपासून या विमानाचा संपर्क तुटलेला आहे. विमानामध्ये एकूण १३ प्रवासी होते. त्यापैकी ८ जण हे विमानातील कर्मचारी आहेत.

आसाममधील जोरहाटमधून सोमवारी दुपारी १२.२७ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केले. ते अरुणाचल प्रदेशमधील मेचूकाच्या दिशेने निघाले होते. उड्डाण केल्यानंतर साधारणपणे ३५ मिनिटांनी विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला. मेचूकापासून ७० किलोमीटर अंतरावर असतानाच विमानाचा संपर्क तुटला. यानंतर भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर्स आणि विमानाच्या साह्याने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात येतो आहे. विमान कोसळल्यामुळे कुठे आग लागली का, हे शोधून त्या माध्यमातूनही विमानाचे अवशेष कुठे मिळताहेत का, याचा शोध घेण्यात येतो आहे. एकीकडे हवाई मार्गाने शोध घेतला जात असताना दुसरीकडे काही सैनिक घनदाट जंगलामध्येही विमानाचा शोध घेत आहेत.

हवाई दलाचे लढाऊ विमान आसाममधून बेपत्ता

मंगळवारी दुपारी नौदलाचे अमेरिका निर्मित 'पी८आय' हे विशेष विमानाही बेपत्ता विमानाच्या शोधासाठी पाठविण्यात आले. पाणबुडीचा शोध घेण्यासाठी हे विमान वापरले जाते. त्या माध्यमातूनही बेपत्ता विमान शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रिसॅटच्या माध्यमातूनही या विमानाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. भारतीय हवाई दलाच्या प्रवक्त्याने मंगळवारी ही माहिती दिली.

विमानामध्ये असलेल्या इंधनाच्या साह्याने ते किती लांबपर्यंत जाऊ शकते, याच्या आधारे त्याचा शोध घेण्यात येतो आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात घनदाट जंगल असल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.