पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

UP सरकारला झटका, पत्रकार प्रशांत कनोजिया यांना तातडीने सोडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

प्रशांत कनोजिया

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे अटक करण्यात आलेले मुक्त पत्रकार प्रशांत कनोजिया यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च आहे. कोणत्याही स्थितीत त्याच्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही. राज्यघटनेने प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे. तो कोणालाही नाकारला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने आपला निकाल देताना स्पष्ट केले.

योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियामध्ये शेअर केल्यावरून अटक करण्यात आलेले दिल्लीस्थित मुक्त पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्यावर सोमवारी पोलिसांनी नव्याने काही गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर मंगळवारी सकाळी सुनावणी झाली.

पोलिसांच्या या कृतीचा माध्यमातील लोकांनी तीव्र निषेध केला होता. 'एडिटर्स गील्ड ऑफ इंडिया'ने या कृतीचा निषेध करून, हा प्रकार म्हणजे कायद्याचा गैरवापर असल्याचे म्हटले होते.