पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शारदा चिटफंड घोटाळा : राजीव कुमार यांना झटका, अटक न करण्याचे आदेश कोर्टाकडून मागे

राजीव कुमार

कोलकाताचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना अटक न करण्यासाठीचे देण्यात आलेले निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मागे घेतले. येत्या सात दिवसांत राजीव कुमार जामीनासाठी योग्य न्यायालयात अर्ज करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. पाच फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार यांना अटक न करण्याचे आदेश दिले होते.

पश्चिम बंगालमध्ये गाजलेल्या शारदा चिटफंड घोटाळ्यात पुरावे नष्ट करण्याचा राजीव कुमार यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीत सहकार्य करण्याचे आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांपुढे हजर होण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये राजीव कुमार यांना दिले होते. 

शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे राजीव कुमार पहिले प्रमुख होते. मे २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयलाच या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. राजीव कुमार यांना अटक करून त्यांची चौकशी करण्याची मागणी गुरुवारी सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. राजीव कुमार हे या प्रकरणातील सबळ पुरावे नष्ट करण्याचा किंवा त्यामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात अडकलेल्या वरिष्ठ नेत्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सीबीआयचे म्हणणे आहे. 

राजीव कुमार यांच्या वकिलांनी सीबीआयच्या वकिलांचा दावा फेटाळून लावला होता. राजीव कुमार यांचा केवळ अपमान करण्यासाठी सीबीआय त्यांना अटक करण्याची मागणी करीत आहे, असे त्यांच्या वकिलांनी म्हटले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:saradha chit fund case Supreme Court ends arrest shield for ex Kolkata top cop gives 7 days to seek bail