पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मॉस्कोत प्रवासी विमानाला भीषण आग, ४१ जण दगावल्याची भीती

मॉस्को विमान अपघात

मॉस्कोतील विमानतळावर एका प्रवासी विमानाने रविवारी इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर त्याला आग लागल्यामुळे यात ४१ जण दगावल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. विमान आगीच्या लोटांमध्ये जळत असल्याचे फोटो काही सोशल मीडिया साईट्सवर दिसत आहेत. मृतांचा आकडा नेमका किती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

विमानाच्या पुढच्या भागातून काही प्रवासी बाहेर आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. विमानाच्या मागच्या भागाला आग लागली. आगीमुळे मागच्या भागातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे दिसत होते. विमानातून एकूण ७८ प्रवासी प्रवास करीत होते. यामध्ये वैमानिक आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार ३७ प्रवासी विमानातून सुखरूप बाहेर पडले आहेत. यापैकी ११ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. पण त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे मॉस्कोतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. आपल्या सदभावना मृतांच्या नातेवाईकांसोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष शोध समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

स्थानिक वेळेनुसार रविवारी संध्याकाळी ६.०२ मिनिटांनी या विमानाने मॉस्को विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाणानंतरच विमानात काहीतरी बिघाड असल्याचे लक्षात आल्यावर ते साडेसहाच्या सुमारास परत मॉस्को विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. इमर्जन्सी लँडिंग असल्यामुळे विमानतळावर सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आली होती. पण विमानाने धावपट्टीवर उतरताच त्याच्या मागच्या बाजूला भीषण आग लागली, असे विमानतळ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.