पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'त्या' बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस

प्रतिकात्मक छायाचित्र

हवाई दलाचे बेपत्ता एएन-३२ विमानाची सहा दिवसांपासून काहीच माहिती मिळू शकलेली नाही. याचदरम्यान, हवाई दलाने या विमानाची अचूक माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. संरक्षण दलाचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी शिलाँगमध्ये ही माहिती दिली. एअर मार्शल आर डी माथूर यांनी ५ लाख रुपयांची घोषणा केल्याचे रत्नाकर सिंह यांनी सांगितले. बेपत्ता विमानाची अचूक माहिती देणाऱ्या व्यक्ती किंवा समूहास हे बक्षीस देण्यात येईल.

भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमानाच्या शोधासाठी नौदल, इस्रोची मदत

या क्रमांकावर देऊ शकता माहिती

विंग कमांडर रत्नाकर म्हणाले की, बेपत्ता विमानाच्या लोकेशनची माहिती ०३७८-३२२२१६४, ९४३६४९९४७७, ९४०२०७७२६७, ९४०२१३२४७७ या क्रमांकावर देता येईल. हवाई दल या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. लष्कर, अरुणाचल प्रदेश प्रशासन आणि इतर संस्थांनी हे विमान शोधण्यासाठी दिवस-रात्र एक केले आहे.

सुमारे सहा दिवसापासून या विमानाचा शोध घेतला जात आहे. पण अजून काहीच हाती लागलेले नाही. या विमानातून १३ जण प्रवास करत होते. आसाममधील जोरहाटमधून सोमवारी दुपारी १२.२७ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केले. ते अरुणाचल प्रदेशमधील मेचूकाच्या दिशेने निघाले होते. उड्डाण केल्यानंतर साधारणपणे ३५ मिनिटांनी विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला. मेचूकापासून ७० किलोमीटर अंतरावर असतानाच विमानाचा संपर्क तुटला. यानंतर भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर्स आणि विमानाच्या साह्याने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात येतो आहे. विमान कोसळल्यामुळे कुठे आग लागली का, हे शोधून त्या माध्यमातूनही विमानाचे अवशेष कुठे मिळताहेत का, याचा शोध घेण्यात येतो आहे. एकीकडे हवाई मार्गाने शोध घेतला जात असताना दुसरीकडे काही सैनिक घनदाट जंगलामध्येही विमानाचा शोध घेत आहेत. हवाई दल प्रमुख बी एस धनाओ यांनीही शनिवारी जोरहाटचा दौरा केला.

हवाई दलाचे लढाऊ विमान आसाममधून बेपत्ता