बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ वर्षी निधन झाले. कॅन्सरशी दोन वर्षे त्यांनी दिलेला लढा अपयशी ठरला मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी रात्री उशीरा प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
T 3517 - He's GONE .. ! Rishi Kapoor .. gone .. just passed away ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 30, 2020
I am destroyed !
ऋषी कपूर यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट करत माहिती दिली आहे. बुधवारी रात्री उशीरा त्यांची प्रकृती अचानक खालावली होती, मात्र ते या परिस्थितीवर मात करून नक्की परततील अशी आशा ऋषी कपूर यांचे भाऊ रणधीर यांनी व्यक्त केली होती. मात्र ऋषी कपूर यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.
देशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू
२०१८ मध्ये ऋषी कपूर यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर लगेचच ऋषी कपूर हे उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये गेले. कॅन्सरवर उपचार घेऊन ते सप्टेंबर २०१९ मध्ये भारतात परतले. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा ऋषी कपूर यांची तब्येत बिघडली. फेब्रुवारी महिन्यांत त्यांचा भाचा अरमानच्या विवाहसोहळ्यातही ऋषी कपूर अनुपस्थित राहिले.
ऋषी कपूर यांनी १९७३ साली 'बॉबी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्यापूर्वी त्यांनी 'श्री ४२०' आणि 'मेरा नाम जोकर' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून कामही केलं होतं. ऋषी कपूर यांचे 'अमर अकबर अँथनी', 'लैला मजनू', 'रफू चक्कर', 'सरगम', 'बोल राधा बोल' यांसारखे असंख्य चित्रपट सुपरहिट ठरले. तर नंतरच्या काळात ते 'कपूर्स अँड सन्स', 'डी डे', 'मुल्ख', आणि '१०२ नॉट आऊट' सारख्या चित्रपटांतही दिसले.
अमेरिकेत कोरोनाचं तांडव, मृतांचा आकडा ६० हजार पार
काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नव्या चित्रपटाचीही घोषणा झाली होती. हॉलिवूड चित्रपट 'द इंटर्न'च्या रिमेकमध्ये ते अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत दिसणार होते.