पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेटमलानींनी वयाच्या १३ व्या वर्षी मॅट्रिक तर १७ व्या वर्षीच घेतली LL.Bची पदवी

राम जेठमलानी

देशातील प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी रविवारी दिल्लीत निधन झाले. देशातील प्रमुख वकिलांमध्ये त्यांचा समावेश होता. जेठमलानींनी अनेक मोठे आणि वादग्रस्त खटले लढले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत महागडे वकील असलेले जेठमलानींनी जीवनात अनेक मोठे खटले लढले आणि जिंकले होते. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९२३ रोजी सिंध प्रांतातील शिकारपूर येथे झाला होता. भूलचंद गुरुमुखदास जेठमलानी आणि पार्वती जेठमलानी असे त्यांच्या आई-वडिलांचे नाव होते. फाळणीनंतर ते भारतात आले होते.

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचं निधन

भाजपवर नाराज होत अटलबिहारींविरोधात लढवली होती निवडणूक

सहावी आणि सातवी लोकसभा निवडणूक मुंबईतून त्यांनी भाजपकडून लढवून जिंकली. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय कायदा मंत्री आणि शहरी विकास मंत्री म्हणून कामही पाहिले होते. वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना भाजपमधून काढण्यात आले होते. तेव्हा त्यांनी वाजपेयी यांच्याविरोधात २०१४ मध्ये लखनऊ मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला होता. ७ मे २०१० मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष झाले. २०१० मध्ये भाजपने पुन्हा त्यांचा भाजपमध्ये समावेश केला आणि राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवले.

दोन-दोन इयत्ता एकाच वर्षी उत्तीर्ण, १७ व्यावर्षी एलएल.बी

राम जेठमलानी हे हुशार कुशाग्र बुद्धीचे होते. शालेय शिक्षणादरम्यान त्यांनी दोन-दोन इयत्ता एकाच वर्षी उत्तीर्ण केल्या होत्या. त्यामुळे १३ व्यावर्षी ते मॅट्रिक्युलेशन परिक्षा उत्तीर्ण झाले होते. १७ व्या वर्षी त्यांनी एलएलबीची पदवी मिळवली होती. त्यावेळी वकिली करण्यासाठी वयाची २१ वर्षे पूर्ण करणे गरजेचे होते. पण जेठमलानी यांच्यासाठी एक विशेष प्रस्ताव संमत करुन १८ वर्षांनंतर वकिली करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी कराची येथील एस सी साहनी कायदा महाविद्यालयातून एलएल.एम ही पदव्युत्तर पदवी मिळवली होती.

दोन लग्नं

१८ वर्षांचे होताच जेठमलानी यांचा विवाह करण्यात आला होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दुर्गा होते. भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर त्यांनी काहीच दिवसांत रत्ना साहनी नावाच्या एका महिला वकिलाबरोबर लग्न केले होते. 

सर्वाधिक शूल्क आकारत

सर्वोच्च न्यायालय- २५ लाख आणि त्याहून अधिक

दिल्ली उच्च न्यायालय- २५ लाख आणि त्याहून अधिक

अनेक हायप्रोफाईल खटले जेठमलानींच्या नावे

- जेठमलानी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येतील आरोपी सतवंत सिंग आणि केहर सिंग यांचा खटला लढवला.

- जेसिका लाल हत्याप्रकरणात त्यांना न्यायालयात आरोपी मनु शर्मा यांची बाजू मांडली.

- उपहार सिनेमा जळीतकांडाच्या आरोप मालक अन्सल बंधूंचा खटला

- २ जी घोटाळ्यात द्रमुक नेत्या कनिमोळी

- सोहराबुद्दीन एनकाऊंटर प्रकरणात विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांची बाजू

- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यासाठी अवैध खाण उत्खणन प्रकरणाचा खटला लढवला.

- शेअर बाजार दलाल हर्षद मेहता आणि केतन पारेख यांचा बचाव केला.

- २ जी घोटाळ्यात यूनिटेक लि.चे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा यांची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत जामीन मिळवून दिला.

- वर्ष २०११ मध्ये रामलीला मैदानात धरणे देत असलेल्या रामदेव बाबा यांच्यावर लष्करी बळाचा प्रयोग करण्यात आला होत. त्यावेळी रामदेव बाबांची बाजू मांडली होती.

- चारा घोटाळ्याशी निगडीत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासाठी २०१३ मध्ये बाजू मांडली.

- २०१३ मध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कारातील आरोपी आसाराम बापू यांचा खटला लढला.

- त्यांनी तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता आणि हवाला डायरी काडप्रकरणी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचा खटला लढवला होता.

- सहारा प्रमुख सुब्रतो रॉय 

- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावतीने तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरोधात मानहाणीचा खटला लढला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ram Jaethmalani Profile Matriculation at age of 13 LLB at 17 know all about him Ram Jethmalani demise live updates