पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या (आयएसआय) एजंटसह चार दहशतवादी भारतात घुसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही माहिती समोर येताच राजस्थान आणि गुजरात सीमेसह संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या पासपोर्टवर हे दहशतवादी भारतात घुसल्याचे सांगण्यात येत आहे.
सिरोही, राजस्थानचे पोलिस अधिक्षक कल्याणमल मीना यांनी सांगितले की, चार लोकांच्या समूहाने आयएसआयच्या एक एजंटसमवेत देशाच्या सीमेत प्रवेश केला आहे. ते लोक कधीही दहशतवादी हल्ला करु शकतात. यासंबंधीचे एक पत्र जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना पाठवण्यात आले आहे.

पत्र मिळताच पोलिस आणि सुरक्षा संस्था हाय अलर्टवर आहेत. पोलिसांना गर्दीच्या ठिकाणी हॉटेल, ढाबे, रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर तपासणीच्या सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर संशयित वाहनांवरही नजर ठेवण्यात आली आहे. संशयित व्यक्तींची चौकशी करण्यास सांगितले आहे.
यापूर्वी ९ ऑगस्टला गुप्तचर संस्थांच्या अहवालात दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला होता. दरम्यान, जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवल्यानंतर सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या अहवालात शेजारील देश भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात आले आहे.