पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधी राजीनामा मागे न घेण्यावर ठाम - सूत्र

राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे न घेण्यावर ते ठाम आहेत. काँग्रेस पक्षाच्या ससंदीय मंडळाची बैठक बुधवारी सकाळी सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडली. या बैठकीत पक्षाच्या सर्व खासदारांनी राहुल गांधी यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. अध्यक्षपदी आपण कायम राहावे, अशी खासदारांची मागणी होती. पण यावेळी राहुल गांधी यांनी आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितले. सूत्रांकडून ही माहिती मिळाल्याचे एएनआयने म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने निवडणूक लढविली होती. त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत गेल्या महिन्यात राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळीच कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला होता. पण त्यानंतरही राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम होते.

डॉ. दाभोलकरांची हत्या आम्हीच केली, कळसकरची कबुली

राहुल गांधी यांनी गेल्या महिन्याभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. त्यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही वेगवेगळ्या नेत्यांसोबत बैठका घेतल्या होत्या. या बैठकांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, हे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. 

दरम्यान, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करीत त्यांना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rahul Gandhi was determined not to take back his resignation as the Congress President sources