पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी पक्षात पुन्हा सक्रिय

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा पक्षाच्या कामात सक्रिय झाले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी तो फेटाळण्यात आला होता. पण ते आपल्या राजीनाम्यावर ठाम होते. मात्र, आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे काय, यावर त्यांनी विविध राज्यांतील प्रभारी नेत्यांकडून अहवाल मागविला आहे. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी चर्चा करून मगच हा अहवाल तयार करावा, असे निर्देश त्यांनी प्रभारी नेत्यांना दिले आहेत. या अहवालानंतर संघटनेत कोणते बदल करायचे, याचे निर्णय घेतले जातील.

RSS च्या कार्यकर्त्यांसारखे प्रचार करायला शिका : शरद पवार

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या सुद्धा पुन्हा एकदा पक्षाच्या कामात सक्रिय झाल्या आहेत. त्या लवकरच उत्तर प्रदेशचा दौरा करणार असून, कोणत्या कारणांमुळे राज्यात काँग्रेसला इतका मोठा फटका बसला, याची माहिती त्या कार्यकर्त्यांकडून घेणार आहेत. गुरुवारी त्यांनी दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशातील काँग्रेच्या नेत्यांशी चर्चा केली. अमेठीमध्ये राहुल गांधी यांच्या पराभवाचे कारण काय, यावरही त्यांनी बैठकीत चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीला उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे हे उपस्थित होते. 

प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानी सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांना प्रत्यक्ष लोकांशी चर्चा करून अहवाल तयार करण्यास सांगण्यात यावे, अशी सूचना त्यांनी प्रभारी नेत्यांना केली.

काँग्रेसला आणखी एक धक्का, तेलंगणामध्ये १२ आमदार फुटले

सर्व जिल्हाध्यक्षांची भेट घेऊन प्रियांका गांधी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्या आपला अहवाल तयार करणार असून, तो राहुल गांधी यांना देणार आहेत. 

राहुल गांधी आपल्या अध्यक्षपदावर कायम राहतील, अशी आशा सर्व ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. पराभवाची कारणे मागवणे, हे पक्षाचे नियमित काम आहे. निवडणूक निकालांनंतर सर्वच अध्यक्ष प्रभारी नेत्यांकडून अहवाल मागवत असतात, असे या नेत्यांनी म्हटले आहे.