पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोनभद्र गोळीबार प्रकरण: प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  सोनभद्र गोळीबार प्रकरणातील जखमींना भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधींना मिरजापूर जिल्हा प्रशासनाने धरणे आंदोलनाला बसल्यानंतर ताब्यात घेतले आहे. सोनभद्र गोळीबारातील जखमींना भेटण्यासाठी प्रियंका गांधी वाराणसी येथील बीएचयू ट्रॉमा सेंटर येथे गेल्या होत्या. जखमींची भेट घेतल्यानंतर त्या सोनभद्र येथील पीडितांच्या भेटीसाठी रवाना झाल्या. मात्र मीर्झापूर -नारायणपूर चौकीजवळ पोलिसांनी त्यांच्या ताफ्याला अडवले. पोलिसांनी अडवल्यानंतर प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते धरणे आंदोलनासाठी बसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

 

प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर मीरजापूर जिल्हा प्रशासनाने त्यांना चुनार येथील गेस्ट हाऊसवर घेऊ गेले. दरम्यान, 'पोलिसांना मला कुठे घेऊन जायचे तिकडे घेऊन जाऊ द्या. योगी सरकारने काहीही केले तरी आम्ही त्यांच्यासमोर झुकणार नसल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले आहे. 'मला फक्त सोनभद्र जाऊन त्याठिकाणी पीडित कुटुंबियांची भेट घ्यायची आहे. मी फक्त ४ लोकांना आपल्या सोबत घेऊन जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र प्रशासन आम्हाला तिकडे जाऊन देत नसल्याचे प्रियंका गांधींनी सांगितले.

 

१७ जुलैला सोनभद्र जिल्ह्यातील येथील उभा गावामध्ये जमीनिच्या वादातून दोन गटामध्ये गोळीबाराची घटना घडली होती. ४ कोटी किंमत असलेल्या जमीनीवरुन गावचा सरपंच आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर सरपंचाच्या माणसांनी गावकऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू तर २५ जखमी झाले. मृतांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. या घटनेनंतर प्रशासनाकडून सोनभद्रमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

दरम्यान, सोनभद्र गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २९ जणांना अक केली आहे. आरोपींकडून बंदुक आणि रायफल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याचसोबत याप्रकरणातील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणाला जबाबदार असलेल्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.