पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शपथविधीपूर्वी मोदींकडून महात्मा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली

नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी दिमाखदार सोहळ्यात सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. राजघाटावर पोहोचून पुष्प अर्पण करून त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. या आधी २०१४ मध्ये शपथ ग्रहण करण्याआधी नरेंद्र मोदी यांनी अशाच पद्धतीने राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली होती. 

महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिल्यानंतर भाजपचे नेते आणि माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्याही स्मृतीस्थळी जाऊन नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि भाजपचे सर्व राष्ट्रीय नेते या ठिकाणी उपस्थित होते. पुष्प अर्पण करून आणि काही क्षण स्तब्ध उभे राहून त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली.

या परदेशी पाहुण्यासह हजारोंच्या उपस्थितीत रंगणार मोदींचा शपथविधी सोहळा

राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ठिकाणी जाऊन शहीद जवानांनाही नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. यावेळी गेल्या सरकारमधील संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. आदरांजली वाहिल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हस्तांदोलन केले आणि नंतर ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील इतरही मंत्री शपथ घेतील. या कार्यक्रमाला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. परदेशातील काही राष्ट्रप्रमुखही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.