पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बालाकोट हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानने लढाऊ विमाने पाठविली पण...

संग्रहित छायाचित्र

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील खैबर पख्तुन्वा भागामधील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये त्या दिवशी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी जे काही केले. त्याचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती या अहवालातून पुढे आली आहे. भारताच्या मिराज लढाऊ विमानांनी लक्ष्यभेद केल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने तेथील आठ हवाई तळांवरून लढाऊ विमाने त्या दिशेने पाठविली होती, अशी माहिती या अहवालातून पुढे आली आहे. पण भारतीय हवाई दलाची विमाने आणि पाकिस्तानी हवाई दलाची विमाने यामध्ये १० मिनिटांचे अंतर होते, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले.

पुलवामा दहशतवादी हल्ला घडल्यानंतर भारत प्रत्युत्तर देईल, याची पाकिस्तानला अपेक्षा होती. पण भारत हवाई हल्ला करेल, असे पाकिस्तानला वाटत नव्हते, असे भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. त्यामुळे हा हल्ला पाकिस्तानसाठी अनपेक्षित होता, हेच सिद्ध झाले आहे. 

भारताच्या मिराज विमानांनी बिनचूकपणे लक्ष्याचा वेध घेतला, हे या मोहिमेचे यश होते. गुप्तचर यंत्रणांच्या साह्याने आपण पाकिस्तानमधील कोणत्याही ठिकाणी अवघ्या तीन तासांच्या आत हल्ला करू शकतो, असेही हवाई दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. ज्या वैमानिकांनी त्या दिवशी मिराज विमानांचे सारथ्य केले. त्यांच्या कामगिरीचेही या अहवालात कौतुक करण्यात आले आहे. ते हवाई दलातील सर्वोत्तम वैमानिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. एकूण सहा हजार जवान या मोहिमेत सहभागी होते. ते हवाई दलाच्या वेगवेगळ्या तळांवर कार्यरत होते. पण कुठूनही याची किंचितही माहिती बाहेर कोणालाही समजली नाही, हे देखील या मोहिमेचे यशच होते.

२६ फेब्रुवारी २०१९ च्या पहाटे ज्यावेळी भारतीय लढाऊ विमानांनी बालाकोटमध्ये हल्ला केला. त्यावेळी तेथील हवामान फारसे उपयुक्त नव्हते. ढगांची दाटी आणि हवामानामुळे या मोहिमेवर काहीसा परिणाम झाला. त्याचबरोबर मिराज विमानांनी सोबत जेवढे बॉम्ब नेले होते. ते सर्व लक्ष्यावर टाकण्यात आले नाहीत. मिराज विमाने आणि त्यामधून बॉम्ब फेकण्यासाठी त्यात बसविण्यात आलेले नवे सॉफ्टवेअर यामुळे काही अडचणी आल्याचेही या अहवालात लिहिण्यात आले आहे.