पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजकीय नेत्यांनी अरुण जेटली यांना वाहिली श्रध्दांजली

अर्थमंत्री अरुण जेटली

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६६ वर्षांचे होते. जेटलींना ९ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जेटली यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी ट्विटच्या माध्यमातून अरुण जेटली यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण जेटली यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'अरुण जेटली एक राजकीय दिग्गज, बुध्दीवान आणि कायदेशीर व्यक्तीमत्व होते. ते एक चांगले नेते होते आणि त्यांनी भारतासाठी कायमस्वरुपी योगदान दिले. त्यांच्या निधनाने खूप दु:ख झाले. अरुण जेटली हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. भारताची राज्यघटना, इतिहास, सार्वजनिक धोरण, शासन आणि प्रशासन यांच्याबद्दल त्यांना अफाट ज्ञान होते.

तसंच, 'भाजप आणि अरुण जेटली यांच्यात अतूट नातं होते. आपल्या राजकीय कारकीर्दीत अरुण जेटलींनी अनेक मंत्रीपदांची जबाबदारी सांभाळली. अरुण जेटलींनी भारताच्या आर्थिक विकासासाठी मोठे योगदान दिले. आमची संरक्षण क्षमता बळकट केली. तसंच त्यांनी लोकांसाठी अनुकूल कायदे तयार केले आणि इतर देशांशी व्यापार वाढविला.', असे मत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण जेटली यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अरुण जेटली यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. ' अरुण जेटलींच्या निधनाने मला खूप दु:ख झाले. जेटली यांचे अचानक जाणे माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. मी केवळ संघटनेचा एक वरिष्ठ नेताच नाही, तर कुटूंबाचा अविभाज्य सदस्यही गमावला आहे. त्यांचे समर्थन आणि मार्गदर्शन मला अनेक वर्षांपासून मिळाले' असल्याचे सांगत अमित शहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून जेटलींना श्रध्दांजली वाहिली.

अरुण जेटली यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. राष्ट्रपतींनी ट्विट करत अरुण जेटली यांना श्रध्दांजली वाहिली. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'एक हुशार वकिल, एक अनुभवी संसद सदस्य आणि प्रतिष्ठित मंत्री म्हणून त्यांनी राष्ट्र उभारणीत मोठे योगदान दिले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील अरुण जटेली यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली. राज्यसभेतील अरुण जेटली यांची भाषणं कायम लक्षात राहतील, असे मत गडकरींनी व्यक्त केले आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुण जेटली यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. जेटलींच्या निधनानंतर त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यांनी ट्विट करत जेटलींना श्रध्दांजली वाहिली. ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'माझे मित्र आणि अत्यंत मौल्यवान सहकारी अरुण जेटली यांच्या निधनामुळे मला खूप दु:ख झाले. ते व्यवसायाने एक कुशल वकील आणि एका कार्यक्षम राजकारणी होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील अरुण जेटली यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की,' भारतीय राजकारणातील अरुण जेटली यांचे योगदान कायम लक्षात राहिल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरुण जेटली यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजजीनंतर काही दिवसांतच आम्ही आणखी एक महान नेता गमावल्यामुळे खूप दु:ख झाले आहे.'