जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूने देशात कहर माजवला आहे. चीनमधून विविध देशात पसरलेल्या या जीवघेण्या विषाणूने भारतात ही एन्ट्री केली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशवासियांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सार्क ( ८ राष्ट्रांचा समावेश असणारी दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संस्था) राष्ट्रांना कोरोना विषाणूविरोधात लढण्याचा मंत्र दिल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशवासियांना संबोधित करणार आहेत.
रत्नागिरीतील रुग्णासह राज्यात ४५ जण कोरोनाच्या जाळ्यात
सार्क सदस्यांच्या राष्ट्रांशी व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन संवाद साधताना मोदींनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताकडून ७२ कोटींचा निधीची घोषणा केली होती. तसेच या संघटनेतील राष्ट्रांनी आपपल्या परीने निधी द्यावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर ते भारतवासियांना कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी काय मंत्र देणार? तसेच एखादी मोठी घोषणा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
रेल्वे, मेट्रो, बसेसमधील प्रवासी क्षमता कमी करणार: मुख्यमंत्री
PM Shri @narendramodi will address the nation on 19th March 2020 at 8 PM, during which he will talk about issues relating to COVID-19 and the efforts to combat it.
— PMO India (@PMOIndia) March 18, 2020
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विट अकाऊंटवर मोदी देशवासियांना संबोधित करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८ वाजता मोदी देशवासियांना संबोधित करतील. कोरोना विषाणूचा वेगाने वाढणाऱ्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची भूमिका स्पष्ट करतील. तसेच देशातील एकंदरीत परिस्थितीच्या आढाव्यासंदर्भात कोणती आणखी कोणती पावले उचलण्याची गरज आहे, यावर ते भाष्य करण्याची शक्यता आहे. देशात आतापर्यंत १५० हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकी एक-एक प्रमाणे तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.