पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परदेश दौऱ्यावरुन परतताच मोदी जेटलींच्या घरी, वाहिली श्रद्धांजली

परदेश दौऱ्यावरुन परतताच मोदींनी दिवंगत मित्र जेटलींना वाहिली श्रद्धांजली (Screengrab)

परदेश दौऱ्यावरुन मध्यरात्री परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी थेट आपले दिवंगत मित्र अरुण जेटली यांचे घर गाठले. पंतप्रधान मोदी यांनी जेटली यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत शोक व्यक्त केला. जेटली यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी हे परदेश दौऱ्यावर होते. बहारिन येथे त्यांनी माझे मित्र अरुण गेले, असे भावूक वक्तव्य केले होते. 

मोदींनी जेटली यांच्या प्रतिमेला फुल वाहिले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. गृहमंत्री अमित शहा हे मोदींच्या आधीच जेटली यांच्या घरी पोहोचले होते. मोदी हे जेटली यांच्या कैलाश कॉलनीतील निवासस्थानी येऊन त्यांनी संगीता जेटली, मुलगी सोनाली आणि मुलगा रोहन जेटली यांच्याशी संवाद साधला. मोदींनी बहारिन येथूनही जेटली कुटुंबीयांशी चर्चा केली होती. रोहन जेटली यांनी मोदींना दौरा अर्धवट सोडून येऊ नका, तुम्ही देशासाठी काम करत आहात, अशी विनंती केली होती.

मोदींनी बहारिनमध्ये भारतीय समुदायासमोर भाषण करताना जेटलींच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. 'मी भलेही येथे तुमच्याशी बोलत आहे, आणि देशात जन्माष्टमीचा उत्सव सुरु आहे. पण माझ्या मनात तीव्र दुःख आहे. माझे प्रिय मित्र अरुण जेटली हे निघून गेले आहेत,' अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.