पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नियोजित मंत्र्यांना नरेंद्र मोदी स्वतः आज संध्याकाळपासून फोन करणार - सूत्र

अमित शहा आणि नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी उद्या, ३० मे रोजी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास चार तास बंद खोलीत बैठक झाली. या बैठकीत मोदींसमवेत कोण मंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर युतीतील मित्रपक्षांना किती मंत्रिपदे द्यायची, कोणते खाते द्यायचे यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. ज्यांना गुरुवारी शपथ घ्यायची आहे, त्यांना मोदी स्वतः बुधवार संध्याकाळपासून फोन करायला सुरुवात करतील, असे सूत्रांनी सांगितले.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात चार तास झालेल्या बैठकीत कोणती चर्चा झाली, यावर अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण भाजपच्या नेत्याने सांगितले की कोणाला मंत्रिपद द्यायचे हे निश्चित करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ममता बॅनर्जी जाणार

गुरुवारी संध्याकाळी सात ते साडेआठ या वेळेत राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रित कऱण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात अमित शहा यांनाही कॅबिनेट मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजपमध्ये एक नेता एक पद धोरण आहे. त्यामुळे जर शहा यांना मंत्रिपद मिळाले, तर त्यांना पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्या स्थितीत जे पी नड्डा यांच्याकडे पक्षाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

नरेंद्र मोदी यांच्या गेल्या मंत्रिमंडळात जे पी नड्डा हे आरोग्य मंत्री होते. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. ते सध्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून संसदीय मंडळाचे सदस्यही आहेत.

इंदिरा गांधी, राजीव गांधींनंतर मोदी करिष्मा असलेले नेतेः रजनीकांत

नव्या मंत्रिमंडळात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणातील नेत्यांना जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत या राज्यात भाजपने मोठे यश मिळवले. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांतील नेत्यांनाही जास्त संधी मिळेल. कारण या राज्यात भाजपने जवळपास एकहाती यश मिळवले आहे.