पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नरेंद्र मोदी यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ, अनेक सदस्यांचे संस्कृतला प्राधान्य

नरेंद्र मोदी आणि अमित शहा

पंतप्रधान आणि लोकसभेचे नेते नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. यावेळी हंगामी अध्यक्ष वीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व सभासद सदस्यात्वाची शपथ घेत आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. एकामागून एक सदस्य शपथ घेत आहेत. सोमवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस सदस्य शपथ घेणार आहेत.

सभागृहाचे कामकाज सोमवारी सकाळी सुरू झाल्यावर संकेतांप्रमाणे सुरुवातीला दोन मिनिटे सर्वांनी शांत उभे राहून स्तब्धता पाळली. सर्वात आधी मोदी यांचे नाव शपथ घेण्यासाठी पुकारल्यावर सत्ताधारी पक्षांतील सदस्यांनी 'भारत माता की जय'चा जयघोष केला.

नरेंद्र मोदी यांनी हिंदीतून शपथ घेतल्यावर हंगामी अध्यक्षाकडे जात त्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी विरोधी सदस्यांच्या बाकांकडे जाऊन त्यांनाही अभिवादन केले आणि मग ते आपल्या जागेवर बसले. 

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, श्रीपाद नाईक आणि अश्विनी चौबे यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. 

१७ व्या लोकसभेच्या कामकाजाला सोमवारी सकाळी राष्ट्रगीताने सुरुवात झाली.