पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांना दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अखेर जामीन मंजूर

पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांची आता तिहार तुरुंगातून सुटका होणार आहे. गेल्या १०५ दिवसांपासून या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालय यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात ते अटकेत होते. २१ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये त्यांना सीबीआयने अटक केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. आर. बानुमती, न्या. ए.एस. बोपण्णा आणि न्या. ह्रषिकेश रॉय यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दोन जामीनदारांच्या अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. चिदंबरम यांना न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय परदेशात जाण्याची अनुमती नसणार आहे. त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये. त्याचबरोबर साक्षीदारांवर कोणताही दबाव टाकू नये, असे न्यायालयाने जामीन मंजूर करताना म्हटले आहे. या प्रकरणावरून चिदंबरम यांनी कोणताही मुलाखत माध्यमांना देऊ नये. त्याचबरोबर कोणतेही जाहीर वक्तव्य करू नये, असेही न्यायालयाने बजावले आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सुरुवातीला सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली होती. त्या प्रकरणात त्यांना आधीच सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला नव्हता. काही दिवसांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. २१ ऑगस्टपासून चिदंबरम अटकेत आहेत. त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी तिहार तुरुंगात जाऊन चिदंबरम यांची भेट घेतली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:P Chidambaram gets bail from Supreme Court in INX Media case 105 days after his arrest in August