प्रियांका गांधी यांच्यासोबत लखनऊमध्ये झालेल्या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. लखनऊमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश पोलिसांनी केला होता. यावेळी पोलिसांनी गळा दाबला, असा आरोप खुद्द प्रियांका गांधी यांनी केला होता. काँग्रेस प्रवक्ता सुष्मिता देव यांनी पत्रकार परिषद घेत हे प्रकरण उचलून धरणार असल्याचे संकेत दिले आहेत.
UP पोलिसांनी गळा दाबला, प्रियांका गांधींचा गंभीर आरोप
सुष्मिता देव म्हणाल्या की, उत्तर प्रदेशमध्ये हुकूमशाही राजवट सुरु आहे. प्रियांका गांधी या विरोधीपक्षाच्या नेत्या आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात शांततेत आंदोलन करणाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करणे हा आमचा अधिकार आहे. प्रियांका गांधी यासाठी आल्या असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. प्रियांका गांधी यांची गाडी अशा पद्धतीने रोखली की अपघात होता होता वाचला. त्यांच्यासोबत ५ लोकांपेक्षा कमी लोक होते. त्यामुळे त्यांच्या कृतीतून कलम १४४ चे उल्लंघनही होत नाही. मग उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न का केला? असा संतप्त सवाल सुष्मिता देव यांनी उपस्थित केला आहे.
आपल्या कामाचे बघा, चिदंबरम यांचे लष्करप्रमुखांना प्रत्युत्तर
सुष्मिता देव पुढे म्हणाल्या, यूपी पोलिसांनी प्रियांका गांधी यांची टू व्हिलर ज्यापद्धतीने घेराव घालून अडवली ते निंदणीय असे होते. सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात विरोध दर्शवताना पुकारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये राज्यातील १८ जणांनी जीव गमावला आहे. त्यातील १२ जणांचा मृत्यू हा पोलिसांची गोळी लागून झाल्याचा दाखला देत त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कामगिरीवर शंका व्यक्त केली. याशिवाय प्रियांका गांधी यांचा रस्ता रोखणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.