पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INX मीडिया घोटाळाः सुप्रीम कोर्टाकडूनही चिदंबरम यांना दिलासा नाही

पी. चिदंबरम

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेल्या अटकेच्या आदेशास स्थगिती देण्यास नकार देत त्यांच्या जामिनावर आता सरन्यायाधीश रंजन गोगोई निर्णय घेतील असे म्हटले आहे. हे प्रकरण आता सरन्यायाधीशांकडे पाठवत आहे, असे या प्रकरणाची सुनावणी करत असलेले न्या. एन व्ही रमण्णा यांनी म्हटले. त्यांनी चिदंबरम यांच्या वकिलांच्या टीमला सर्व औपचारिकता पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पी. चिदंबरम यांचे प्रकरण न्या. रमण्णा यांच्यासमोर सादर करत अटकेला स्थगिती देण्याची मागणी केली. 

सीबीआयकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सिब्बल यांच्या मागणीला आक्षेप नोंदवला. यावर न्या. रमण्णा यांनी हे प्रकरणी सरन्यायाधीशांकडे पाठवत असून तिथे आपले म्हणणे मांडा, असे म्हटले. यावर सिब्बल यांनी आम्हाला अटकेची भीती आहे. आमची याचिका ऐकून घ्या, अशी विनंती केली. यालाही तुषार मेहता यांनी विरोध केला. न्या. रमण्णा यांनी कोण आणि केव्हा सुनावणी करतील हे सरन्यायाधीश ठरवतील, असे सांगत सध्या न्यायालय अटकेला स्थगिती देऊ शकत नसल्याचे म्हटले.

काय आहे प्रकरण

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन देण्यास मंगळवारी नकार दिला. अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. पण तिथेही त्वरित सुनावणी करण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर मंगळवारी सांयकाळी सीबीआय आणि ईडीची पथके त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. पण चिदंबरम त्यांच्या हाती लागले नाही. आता सर्वांच्या नजरा या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर आहे. जर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना जामीन दिला नाही तर त्यांची अटक निश्चित आहे.