१६ डिसेंबर २०१२ मध्ये राजधानी दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर विकृत मनोवृत्तीच्या नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. उपचारादम्यान पीडितेने आपला जीव गमावला. ही घटना देशातील सर्वांना धक्का देणारी होती. पीडितेला न्याय देण्यासाठी संपूर्ण देश एकजूट झाल्याचे पाहायला मिळाले. पीडितेला निर्भया असे नाव देण्यात आले. पीडितेला दिलेल्या या नावानेच तिला न्याय देण्यासाठी लाखोच्या संख्येने तरुण-तरुणी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. पीडितेच्या कुटुंबियांसह संतप्त देशवासियांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यातही आली होती. ही शिक्षा कायम ठेवत दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याप्रकरणातील चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं आहे. चारही आरोपींना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे. एक नजर टाकूयात तब्बल सात वर्ष सुरु असलेल्या या प्रकणात आतापर्यंत घडलेल्या घडामोडींवर...
निर्भयाच्या दोषींना गय नाही, २२ जानेवारीला ७ वाजता होणार फाशी
#१६ डिसेंबर २०१२: रविवारी रात्री चित्रपट पाहून आपल्या मित्रासोबत पिडिता मुनीरिका येथून द्वारकाच्या दिशेने जाण्यासाठी बसमध्ये बसली. या बसमध्ये काहींना तिच्यासोबत सुरुवातीला असभ्य वर्तन केले. तिच्या मित्राला मारहाण करुन नराधमांनी तरुणीवर बलात्कार केला. पीडिता आणि तिच्या मित्राला दक्षिण दिल्लीतील महिपालपूर परिसरात बसमधून फेकून दिले. गंभीर अवस्थेत पीडितेला दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले.
#दिल्ली पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी बस चालकाला अटक केली. त्याचे नाव रामसिंह असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर दोन दिवसांनंतर चार आरोपींना अटक केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी प्रसारमाध्यमानंत दिली होती.
# १८ डिसेंबर २०१२ संसदेत या घटनेचे पडसाद उमटले. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.
रुग्णालयात दाखल पीडितेची अवस्था गंभीर होती तिला व्हेंटिलिटरवर ठेवण्यात आले होते. पीडिता निर्भया नावाने देशाची मुलगी बनली होती. सोशळ मीडियावर तिला न्याय देण्यासाठी महिला-पुरुष मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.
#२२ डिसेंबर २०१२ : दिल्लीतील कडाक्याची थंडी आणि मेट्रो स्टेशन बंद करण्यात आल्यानंतरही इंडिया गेटवर मोठ्या संख्येने आंदोलन झाले.
#३ जानेवारी, २०१३: पोलिसांनी ५ जणांवर हत्या, बलात्कार यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.
#१७ जानेवारी, २०१३: जलगती न्यायालयात पाचही आरोपींना दोषी ठरवण्यात आले.
#११ मार्च २०१३ मुख्य आरोपी राम सिंहने तिहाड तुरुंगात आत्महत्या केली.
#१४ सप्टेंबर २०१३ : विशेष कोर्टाने चार दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. तर एका आरोपीला अल्पवयी असल्यामुळे बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
#३१ ऑक्टोबर, २०१३: बालन्याय मंडळाने (ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड) अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवले. त्याला तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
#१३ मार्च, २०१४: दिल्ली उच्च न्यायालयाने चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली
#१५ मार्च, २०१४: सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली
#२० डिसेंबर, २०१५: अल्पवयीन मुलाला बालगृहातून सुटका झाल्यानंतर देशभरात विरोध करण्यात आला. व्यापक आंदोलनही करण्यात आले.
#२७ मार्च, २०१६: सर्वोच्च न्यायालयाने आरोपींनी दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय राखीव ठेवला.
#५ मे, २०१७: सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली
#९ नोव्हेबर , २०१७: यातील एक दोषी मुकेशने सर्वोच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेवरील पुनर्विचार याचिका दाखल केली. ती न्यायालयाने फेटाळून लावली.
#१८ डिसेंबर २०१९ : दोषी अक्षय ठाकुर याची पुनर्विचार याचिका फेटाळली
#७ जानेवारी २०२०: डेथ वारंट जारी, २२ जानेवारीला ७ वाजता आरोपींना फाशी चढवण्याचे पटियाला हाऊस कोर्टाचे आदेश